आयुष्याचा पेला दुःखा ने भरलेला असताना त्याची दाहकता, तीव्रता चर्येंवर न उमटू देता समाजासाठी कार्यरत राहून पुरुषार्थ साध्य करणारेच महापुरुष ठरत असावेत.
विजूदादाही त्यापैकीच एक...
विजू दादा म्हणजे 'सुखी माणसाचा सदरा' या गोष्टीतील तो सदरा घातलेला सुखी माणूस असे मला लहानपणापासून वाटायचे. पण मानवी जीवनाच्या व्यथा त्यांच्याही वाट्याला आल्याचं. पुत्र वियोगाचे दुःख अवेळी पदरात पडले. इंजिनियर झालेल्या आमच्या दैदिप्यचे एका अपघातात निधन झाले.पण आयुष्याचा पेला दुःखा ने भरलेला असताना त्याची दाहकता, तीव्रता चर्येंवर न उमटू देता समाजासाठी कार्यरत राहून पुरुषार्थ साध्य करणारेच महापुरुष ठरत असावेत.
विजूदादाही त्यापैकीच एक...एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, काळाचा खेळ असा की कधीही त्यांच्या अवती भवती नसणारा मी दैदिप्यच्या अपघाता नंतर हॉस्पिटलच्या आवारात रात्रभर बसून होतो. सकाळी मृतदेह घाटकोपरहून नवी मुंबई सिवूड त्यांच्या घरी घेऊन जाणार होते.
दैदिप्यचे कपडे, शूज एका बॉक्समध्ये घालून माझ्याजवळ कुणीतरी दिले होते.मी एका बाजूला बसलो होतो आणि अचानक मला विजू दादांनी हाक मारली आणि त्यांच्या बाजूला बसवलं... थोड्या वेळाने मला 'ऍम्ब्युलन्स मधे बसून घे नाहीतर चुकशील' असं म्हणाले... या गोष्टीचा मी अजूनही विचार करतो की पोटचा मुलगा कायमचा जग सोडून गेला आहे आणि हा माणूस माझी काळजी करतोय.या स्मृती मनपटलावर कायमच्या कोरल्या गेल्यात.
त्यानंतर काही वर्षांनी मी आणि माझा भाऊ अडचणीत असताना मदतीच्या अपेक्षेने विजूदादांकडे गेलो होतो सिवूडला त्यांच्या घरी... त्यांनी जवळ बसवून विचारपूस केली, खायला घातलं, काही काळजी करु नका... म्हणून सांगितले निघताना गाडीभाडे म्हणून काही पैसे माझ्या भावाच्या खिशात घातले... आम्ही चालत चालत सिवूड स्टेशनकडे निघालो... वरून त्यांनी आवाज देऊन हाताने 'बाय' केलं. कितीतरी वेळ ते दादा- वहिनी गॅलेरीत उभे राहून हात दाखवत होते... आम्ही वारंवार मागे बघत होतो... ते हात दाखवतच होते... आम्ही स्टेशनवर पोहोचेपर्यंत ते गॅलेरीत उभे होते.
लहान असताना आम्हाला जो प्रश्न पडायचा की जयंतीच्या काळात दादांची कोणती परीक्षा असेल? काय शिकत असतील या वयात?त्याचा उलघडा मास्टर्स चा अभ्यास करताना झाला. दादांनी त्यांचं मास्टर्स environmental engineering technology मधे केलंय आणि माझं मास्टर्स environmental science मध्ये.हा योगायोग मला खूप प्रिय वाटतो...
जेव्हा एखादं काम खूप मोठं होतं, ते काम करणारी माणसं मोठी होतात तेव्हा त्यांचं सामान्य माणसा- समाजाशी असलेलं नातं तुटतं, असं म्हणतात. ती माणसं आपल्या वेगळेपणाच्या वलयात स्वतः ला हरवून घेतात आणि हस्तीदंती मनोऱ्यात आजच्या भाषेत बोलायचं तर' पॉश अँड पॉलिश्ड' वातावरणात राहण्यात समाधान मानतात.. विजू दादा आणि वहिनी या प्रकारची माणसंच नाहीत. ते दोघेही स्वभावाने प्रेमळ आणि ऋजू आहेत आणि त्यामुळेच समाजाच्या आणि आमच्या मनात मानाचं स्थान पटकावून आहेत.
मला कल्पना आहे या लेखनात काही नावीन्य नाही. आप्तस्वकियांना, समाजाला हे परिचयाचे आहे.पण काळाच्या ओघात काही स्मृती धूसर झाल्यात, जिव्हाळ्याचे झरे पूर्ण कोरडे होण्याआधी त्यात ओलावा निर्माण करणं आणि धूसर झालेल्या आठवणी पुन्हा-पुन्हा आठवून, डोळे ओले करत, दृष्टीची काच स्वच्छ करणं, महत्वाचं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच इतकंचं...
दादा, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. कित्येक वर्षांपूर्वी तुम्ही प्रज्वलीत केलेला हा ज्ञानमयप्रदीप वर्षानुवर्षे तेवत राहो. समाजाची मनं उजळत राहो. नाना प्रकारच्या वृक्ष वेलींचं वरदान लाभलेल्या जिंती गावाचं तुम्हाला आणि जिंतीला तुमचं स्मरण, तुमचा सहवास सतत आनंददायी वाटत राहो. अशी या वाढदिवस प्रसंगी सदिच्छा व्यत करतो.
जीवेत शरद: शतम्...
-----------------------------------------------------
जयसिंग कांबळे
18 ऑगस्ट 2025 — with Sanjay Anand.
0 Comments