शाळा

 शाळा  - हायस्कुल





(ही शाळा काल्पनिक आहे. )


पण पक्या म्हणतो ही शाळा तुम्हाला मालवणी मुलखात सगळीकडे दिसेल.


शाळा पवित्र आहे


शिक्षक पूजनीय आहेत


पण मंडळाचे काही लोक फार

 महान आहेत.


शाळेत तुम्हाला गावातला क्लार्क आणि शिक्षक दिसणार नाहीत. क्लार्कचा रेट 10 ते 15 लाख आहे. शिक्षकाचा रेट 15 ते 25 लाख आहे. एवढे पैसे गावातील लोक द्यायला तयार आहेत. पण मग गावात बोंबाबोंब होते. म्हणून बाहेरचे शिक्षक घ्यायला बरे पडतात. 


शिवाय बाहेरचा माणूस गावच्या राजकारणात पडत नाही.


*

सत्तर वर्षापूर्वी गावात शाळा नव्हती. मग काही लोकांनी उचल घेतली आणि शाळा चालू केली. मुंबईत गावचे मंडळ स्थापन केले.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस निवडले जाऊ लागले. गावातील मुले शिकायला लागली.  शिक्षक मिळत नव्हते कारण गावात यायला रस्ता नव्हता आणि एकंदर शिकलेले लोक कमी होते.मग विंनती करून शिक्षक गावात आणले गेले.


ती पिढी सम्पली,  तो काळ सम्पला आणि तो सेवाभाव पण सम्पला. शिकलेले लोक जास्त झाले आणि नोकऱ्या कमी. शिक्षक लोकांना नोकरीत घ्यायचे भाव ठरू लागले. मग गावातले लोक नोकरीत दिसायचे बंद झाले आणि बाहेरचे शिक्षक दिसू लागले.


गावातील पोरे शाळेत नोकरी मिळावी म्हणून जीव घालवतात. त्यांना लाथ मारून हाकलले जाते. बिचारी पोरे पोटासाठी वणवण भटकतात. कोण मुंबईत जाते. ट्रेनचे धक्के खात जीव मुठीत धरून जगतात.


**

मंडळाचे काही लोक चांगले आहेत. ते आपल्या खिशातील पैसे खर्च करून शाळेचे काम करतात.


**

दरवर्षी अध्यक्ष महोदय काहीतरी नवीन टूम काढतात.शिक्षक आणि शिपाई लोकांकडून एक एक महिन्याचा पगार जमा करून घेतात. बिचारे नोकरवर्ग गप्प बसून पाहतात.


शिक्षक लोक मुलांसाठी मेहनत घेतात. या आदरणीय शिक्षकांना मंडळ तुच्छपणे वागवतात. मुख्याध्यापकाला कोणताही मान दिला जात नाही.


काहीपण कार्यक्रम असला की कधी वाढीव कधी खोटी बिले दाखवली जातात, असे पक्या म्हणतो. ऑडिट हल्ली हल्ली करायला लागले. ते पण दाखवायला.


गावातल्या एका वाडीवर विद्यार्थी पाहिजेत म्हणून मंडळ फिरते. देणगी मागतात पण त्या वाडीच्या लोकांना मंडळावर घेत नाहीत.


अध्यक्ष कोणत्या घरातून होणार, ते नेहमी ठरलेले असते.


आता त्यांनी माजी विद्यार्थी लोकांचे व्हाट्सएप ग्रुप स्थापन केले आहेत. ग्रुपवर ज्याचा वाढदिवस असेल त्याचा जयजयकार केला जातो. तो बिचारा पाच नाहीतर दोन हजार रुपये काढून देतो. गेलाबाजार एक हजार रुपये कुठेच गेले नाहीत.


देणगी घेणार पण विचार व्यक्त केले तर ते मात्र नको. देणगी द्या आणि गप्प बसा.


मंडळ पैशाचे काय करते, हे काही माजी विद्यार्थ्यांना चांगले माहीत आहे. त्यामुळे ते देणगी द्यायच्या भानगडीत पडत नाहीत.


एक टेम्परवारी शिक्षक ठेवला आहे. त्याला पगार पाच हजार महिना. तो पण त्याला नीट देत नाहीत. 


हल्ली त्यांनी शाळेत पन्नास साठ लाखाची बिल्डिंग बांधायला घेतली आहे. एकतर गावात आता कोण कुत्र राहत नाही. शाळेत जेमतेम 100 पोरे आहेत. मग एवढा खर्च कशाला आणि ही बिल्डिंग कोणासाठी हा प्रश्न गावाला पडला आहे. पक्या म्हणतो, 15 नाहीतर 20 लाख खर्च करणार आणि बाकी वाटून घेणार. काय माहीत!


दहा वर्षांपूर्वी आमच्या भाऊने एक वर्ग खोली बांधून देतो म्हणून सांगितले होते. मंडळाने त्यात रस घेतला नाही. त्या ऐवजी आम्हाला रोख रक्कम देणगी द्या असे आडून सुचवले गेले. 


**

पक्याने ठरवले आहे, यापुढे शिक्षकाची भरती होईल तेव्हा गावातलाच एक पोरगा घ्यावा म्हणून सगळे गाव दबाव आणणार. शिवाय त्यांना ही बिल्डिंग नको आहे. तो पैसा इतर चांगल्या कामात वापरावा.


मी पक्याला विचारले, तुला भीती वाटत नाही का? ही गावातील मोठी माणसे आहेत. ती तुला सोडतील का?


पक्या म्हणतो, " आम्हाला शिकवायला एक  बाई होत्या. त्या म्हणायच्या चार दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा."


डॉ सतीश सदाशिव पवार

नरडवे, कणकवली

18 march 2021.


Post a Comment

0 Comments