लोकसंख्यावाढ एक विचार





 पृथ्वीतलावर जे काही निसर्ग नियमांच्या विपरीत घटना घडत आलेल्या आहेत त्या अधिकतम प्रमाणात मानवी विचारशैली मधून कृतीत आल्याचे दृष्टीपथात आहे . लोकसंख्यावाढ ही देखील अशाच एक विचारप्रवाहातून विस्फोटक होत जाणारी घटना शृंखला आहे. आदिमानवाच्या  विचार प्रक्रियेपासून लोकसंख्या या विषयाला जोडण्याचा विचार केला असता तर त्याच्यातील अनेक कारणांचा आपल्याला उहापोह  करण्याची आवश्यकता निदर्शनास आल्या खेरीज राहणार नाही. मानव हा निरीक्षणांमधून खूप काही आत्मसात करत असतो , त्याचाच एक भाग म्हणून माणूस जेव्हा स्वतःला असुरक्षित समजत असतो त्यावेळी तो आपल्या जवळ कोणीतरी आपला सहकारी , आपला संरक्षक , आपला हितचिंतक , आपला काळजी घेणारा असावा असे त्याला जाणीवपूर्वक वाटत असते .


मानव टोळी - टोळीने , समुह- समूहाने भूतकाळात वास्तव्य करत असताना एक समूह दुसऱ्या समूहावर आक्रमण करून पराजित समूहाची चल - अचल संपत्तीवर आपला अधिकार प्रस्थापित करत असत , तसेच पराजित समूहातील स्त्री पुरुषांना गुलाम व नोकर म्हणून आपल्या समूहात सामील करून घेत असत. अशाच आक्रमणकारी भूमिकेतून पराजीत झालेल्या समूहाचा विचार करता त्यांना असे जाणवत असे की आपल्या पराजय आपण संख्येने कमी असल्याने झाल्याचे निदर्शनास येत असे. पुढे त्याच भावनेने त्यांनी आपल्या समूहाचा प्रजनन दर स्री पुरुषांच्या आरोग्याचा तीळमात्र विचार न करता तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचा , मर्यादित साधन संपत्तीचा विचार न करता वाढविण्यास प्रारंभ केला असावा.


 मानवाची असुरक्षिततेची भावना , अज्ञान , आरोग्याच्या जुजबी सोई सुविधांचा अभाव ,  अंधश्रद्धा ,  समाजकारण , राजकारण हे महत्त्वाचे घटक लोकसंख्या वाढीला कारणीभूत आहेत. घराला वंशाचा दिवा हवा म्हणून कुटुंबात मुलाच्या जन्मापर्यंत मानवी स्वभाव दोन , चार ,सहा पर्यंत मुलींनी कुटुंबात जन्म घेतला तरी हरकत नाही असे अज्ञान साधारणपणे बहुतेक कुटुंबात पहावयास मिळत असे. सदर साखळी तयार होऊन मग बौद्धिक अज्ञानातून कौटुंबिक आर्थिक दारिद्र्य निर्मित होऊन जायला वेळ लागत नसे.


 जगभरात गतकाळात अनेक तर्‍हेच्या रोगराई , महामाऱ्या होऊन गेल्या व सध्या देखील अशा प्रकारच्या रोगराई व महामाऱ्या आहेत. आपल्या भारत देशाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवल्यास भारतात प्लेग सारखे अनेक विध प्रकारचे रोगराई होऊन गेल्या. तत्कालीन परिस्थितीमध्ये खेड्यातील व शहरातील बहुतेक कुटुंबच्या कुटुंब नाहीशी झाली . भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आरोग्याच्या प्राथमिक व जुजबी  सुविधांचा अभावाने  सर्वसाधारण कुटुंबाच्या मनातील भीतीपोटी म्हणजे येणाऱ्या महामारीमध्ये आपण स्वतः जिवंत राहू की नाही आणि आपल्या पोटी जन्म घेतलेले अपत्य देखील  भविष्यात हयात राहतील की नाही अशा धारणेतून जन्मदरावर नियंत्रण ठेवले नाही.


 अंधश्रद्धा हा देखील लोकसंख्या वाढीस कारणीभूत घटक समजला जात असतो. अंधश्रद्धेतून निर्मित साधारण कुटुंबाचा विचार शैलीच्या नजरेतून पाहिल्यास असे दिसते की अपत्य जन्माला घालणं हे मानवाचे हाती नसून दैवी चमत्काराने अपत्य जन्माला येत असतात . अशा भोळ्या -  भाभड्या अंधश्रद्धेपोटी देखील जन्मदर सतत उंचीवर चढत्या स्वरूपात राहिला व गणितीय भाषेत सांगायचे राहिल्यास तो गुणाकार पद्धतीने आजमितीस सक्रिय आहे.


 आधुनिक काळात काही मानवी विचारातुन आपल्या नजरेत हेदेखील समोर येऊ शकते की , माझ्या समाजाची लोकसंख्या वाढावी या दृष्टीने देखील जन्मदर वाढविण्यात येत असतो.  तर काही ठिकाणी सत्ता मिळविण्याचा आशेपोटी विशिष्ट समाजाची लोकसंख्या वाढविण्यात येत असते.  साधारणपणे 1950 ते 1980 दरम्यान म्हणजे 20 व्या शतकात काही भागात लोकसंख्येत वाढ झालेली दिसून आलेली आहे. लोकसंख्येच्या संदर्भात भारत देशाचा आजमितीस विचार केला तर आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत व लवकरच सर्व देशांना खूप-  खूप लांब टाकून प्रथम क्रमांकावर येणार आहोत.



                  लेखन :  हेमकांत मोरे 

                      नंदुरबार.

             94 23 91 70 74

Post a Comment

0 Comments