प्रकाशक आणि मी



अमर पवार

भाषा शिक्षक, कळसुली इंग्लिश स्कुल


प्रत्येक कविला वाटते की आपले काव्यसंग्रह छापावे. त्याचा प्रकाशन सोहळा करावा. पेपरात आपले नाव यावे.


संग्रह छापायला खर्च येतो. आजकाल कवितेचे पुस्तक कोण विकत घेत नाही. मात्र महापुरुषांवर कविता केल्या तर काही प्रकाशने आपल्या खर्चाने छापतात. ग्रंथालयांना खपवतात. 


 बाकी कवी आपल्या खर्चाने पुस्तक छापतात. आणि जवळच्याना भेट देतात किंवा गळ्यात मारतात. मी इथे कवीची चेष्टा करत नाही, हे कृपया लक्षात घ्या.


माझ्या नरडवे गावचे प्रकाशक आहेत श्री संतोष सावंत. मी त्यांना डोंबिवलीला मुद्दाम जावून भेटलो आहे. एकदम सद्गृहस्थ आहेत. ते चांगले कविपण आहेत. 


माझा संग्रह त्यांच्याकडे छापायचा असे मी ठरवले. पण तेवढयात मला एक गृहस्थ भेटले. काही कारणामुळे ते जवळचे होते. त्यामुळे  ऑर्डर  त्यांना द्यायचे ठरवले.


त्यांचे जे पैसे होते ते मी मान्य केले. घाई करू नका. आरामात दोन महिने लागले तरी चालेल असे मी त्यांना सांगितले.


मला वाटले माझ्या कविता, प्रस्तावना आणि मुखपृष्ठ त्यांना जीमेलला पाठवले आणि क्रम लावून दिला की विषय सम्पला. सगळ्या कविता मी परत परत वाचल्या होत्या. नन्तर परत वाचायची तयारी ठेवली होती. 


पण नाही.


ते मला म्हणाले, सगळ्या कविता युनिकोड करून घ्या.


आता मला युनिकोड काय माहीत? मी माझी स्टाफ मीनाक्षीला बोललो, ' युनिकोड काय असते ते शोध '. स्टाफने नेटवर शोधले आणि सगळ्या फाईल युनिकोड केल्या. पाठवल्या. 


मग म्हणाले यातले सर्व शब्द देवनागरी लिपीत पाहिजेत. रोमन लिपी नको. मला ते विचित्र वाटले. पण मी केले. सगळे रोमन शब्द बसून काढुन देवनागरी टाकले पण त्यामुळे काही कवितांचा फील बदलला.


नंतर प्रकाशक म्हणाले, ' ह्या कविता मला एका पाठोपाठ एक अशा वाचता यायला पाहिजेत. स्क्रोल करता यायला पाहिजे. तसे करून द्या'.


आता हे मला कसे येणार? मी खूप विचार केला. म्हटले प्रकाशक आपला आहे. नवीन दिसतोय. आपण सहकार्य करूया. 


मी त्यांना म्हटले,' मी माणूस शोधतो आणि तुम्हाला इबुक बनवून देतो. ते तुम्ही फक्त छापा'.


प्रकाशक म्हणाले, ' मला तुमचे इबुक चालणार नाही कारण आमची डिझाइन करायची स्वतंत्र टीम आहे:.


हे ऐकून मला फेफरे आले. महाराजा, तुमची स्वतंत्र टीम आहे तर मला युनिकोड आणि स्क्रोलची हमाली कशाला लावली?


पण मी काही बोललो नाही. 


एके दिवशी म्हणाले, ' आता सगळ्या कवितांचे प्रिंट पेपरवर काढा आणि पाठवून द्या'


माझ्या लक्षात आले की ही निरर्थक हमाली आहे.


मी ही हमाली करणार फक्त अजून किती हमाली करायची ते मला स्पष्ट कळले पाहिजे.


मी वैतागलो. 


मी त्यांना तीव्र नाराजीचा संदेश पाठवला आणि सांगितले मला चेकलिस्ट द्या. मला अजून काय काय करायचे आहे? मी बीझी माणूस आहे थोडासा.


साहेब माझ्यावर गरम झाले आणि मला तीन शब्द सुनावले, ' आतून यायला पाहिजे'. मला अनफ्रेंड केले आणि मला टाकुनी बाबा गेला. 


म्हणजे ह्यांना पैसे द्यायचे आणि निरर्थक हमाली करायची तेव्हा कुठे साहित्यिक जन्माला येतो. 


अजुन कीती आतुन यायला पाहीजे?


चेकलिस्ट का नाही?


मग मी परत गाववाले सावंत साहेबांना शरण गेलो. त्यांनी काही चांगला सल्ला दिला. 


मी ठरवले प्रथम इबुक तयार करायचे आणि नन्तर वाटले तर छापायचे.


मालवणच्या मेघना जोशी मॅडमनी इबुक बनवणारा माणूस गाठ घालून दिला. पण तेवढयात माझ्या घरातीलच माणूस इबुक बनवू शकतो हे मला कळाले.


अमर पवार हा माझा चुलत चुलत भाऊ. कळसुली इंग्लिश स्कुलला संस्कृत आणि हिंदी भाषा विषय शिक्षक आहे. अमर चित्रकार, कवी , कलाकार सर्व आहे. मुख्य म्हणजे विनम्र आहे. 


मी त्याला जीमेलला कविता पाठवल्या. मुखपृष्ठ, प्रस्तावना, अभिप्राय पाठवले. क्रम तुला पाहिजे तसा लाव असे सांगितले.


कोण म्हणतं की प्रस्तावना पहिली पाहिजे?


त्याने तेवढ्या सामुग्रीवर चार दिवसात वर्ड, पीडीएफ, मोबी, इपब या चारी फॉरमॅटमध्ये मला कोणताही त्रास न देता इबुक बनवून दिले. रोमन लिपी नको असे म्हटला नाही. इपब मोबाईलवर छान सूट होते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर प्ले बुक हे अँप आहे. पैसे घेतले नाही.


मी कवी थातुरमातुर या संग्रहावेळी अमर पवार , मा. वैशाली पंडित , देवगडचे डॉ आठवले सिनिअर, डॉ मिलिंद कुळकर्णी यांनी मी सांगितले तसे लगेच काम करून दिले. यांच्या मागे लागावे लागले नाही. बाकी अभिप्राय माझ्याकडे आधीच तयार होते.


इबुकला ISBN नंबर घेतला की हे पुस्तक प्रमाणित झाले. 


**


कोणतरी म्हणाले, ' पुस्तक कागदावर छापले नाही तर पुरस्कार मिळणार नाही.'


पुरस्कार नको. फक्त छंद.


पुरस्कारासाठी मित्र मित्रावर कुरघोडी करतो. महापुरुषांवर कविता ठरवून पुरस्कार मिळावा म्हणून लिहिल्या जातात. 


मी फक्त नोबल प्राइझ आणि ज्ञानपीठ पुरस्कार घेणार.


महाराष्ट्र भूषण देतो म्हटले तर नाही म्हणायचे नाही.


**


आभार अमर.


गाववाले प्रकाशक संतोष सावंत यांचेपण माझ्यावर ऋण आहेत. ते माझ्यावर रागावले नाहीत. ते माझ्या लक्षात आहेत.


**

  कवींसाठी मला वाटते इबुक केले तर पैसे वाचतील. ते आपण इतर ठिकाणी वापरू शकतो. आपली जाहिरात कोण करत नाही? मी तरी करतो बाबा. आपण आपले पुस्तक छान आहे असे म्हणायचे नाही. ते इतरांना म्हणू दे. पण आपण पुस्तक काढले आहे याची बातमी पेपरात, ऑनलाइन मीडियात आणू शकतो. इबुक पुस्तक गळ्यात मारावे लागत नाही. मोफत देऊ शकतो. सगळे म्हातारे लोक पण आता मोबाईलवर लेख वाचतात. 


हळूहळू इबुक या वर्गालापण पुरस्कार दिले जातील. आजचा ईबूक हा नवीन ट्रेंड साहित्य जगभरातील लोकांपर्यंत पोहचवण्याचा सोईस्कर व प्रभावी मार्ग आहे. आज बरीच लोकप्रिय पुस्तके डिजिटल स्वरूपात येत आहेत. नवीन लेखकसुद्धा  पारंपरिक प्रकारच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोपस्कारांच्या कटकटी शिवाय कमी वेळेत व कमी खर्चात आपले पुस्तक प्रकाशित करू शकतो. यासाठी अमुक एखाद्या प्रकाशकाची किंवा प्रकाशनाची गरज नाही. कुणीही आपले ईबूक स्वतः हुनही प्रकाशित करू शकतो.


आणि हो अमेझॉन किंडल, गूगल प्ले बुक अशांच्या माध्यमातून  योग्य किंमतीत उपलब्ध केल्यास लेखकालाही आर्थिक प्राप्ती होऊ शकते.


**

प्रत्येक लेखक तुम्हाला त्याच्या प्रकाशकाची खास पराक्रमाची गोष्ट सांगेलच.


सगळे प्रकाशक असे नसतील. बरेच प्रोफेशनल असतीलच. 


तरी बाकी प्रकाशकानो जरा सुधरा ओ. पैसे झाडाला लागत नाहीत. कित्येक साहित्यिक पैसेवाले नाहीत.





डॉ सतीश  सदाशिव पवार

कणकवली

Post a Comment

0 Comments