मधुकरी- वशिला


 वशिला


 (पूर्वार्ध)



'वशिला' शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे 'व्यक्तीच्या प्रभावाचा एखादं काम होण्यासाठी केलेला उपयोग किंवा दुरुपयोग'. 'वशिला' शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी? याचा विचार करता,  वशीकरण शब्दाशी त्याची नाळ जुळते, असं वाटतं. एखाद्या व्यक्तीला वश करण्याकरता तंत्र मंत्राचा गत काळी उपयोग करायचे किंवा काही प्रमाणात आजही केला जातो, असे म्हणतात. झाडपाला, होम-यज्ञ, पूजा-अर्चा इत्यादी साठी ती व्यक्ती समोर अथवा सान्नीध्यात असायला पाहिजे, ही पूर्व अट असायची.


आणि प्रत्यक्ष हजर राहणे शक्य नसेल तर तावीज, भस्म, अंगारा, गंडा, दोरा यांचा उपयोग सर्रास होत होता. त्यातूनच आधुनिक काळात वशिलेबाजीच्या संपर्क साधनांच्या रूपात चिठ्ठी, शिफारस पत्र, निरोप, फोन, किंवा क्वचित प्रसंगी प्रत्यक्ष भेट यांचा उपयोग सुरू झाला असावा.


आपल्याकडे शिक्षणानंतर स्वतःचा काही उद्योग धंदा करायला पाहिजे हा विचार फारच अभावाने केला जातो. नोकरी मिळवण्याकडे आणि त्यातही सरकारी नोकरी मिळवण्याकडे बहुसंख्य मध्यमवर्गीयांचा कल असतो.त्या मुळे नोकर्‍या कमी आणि त्या मिळवण्यासाठी धडपडणारे असंख्य. त्यातही बऱ्याच वेळेला लायकी आणि पात्रता असून सुद्धा चांगली नोकरी मिळेलच याची खात्री नसते. म्हणून मग काम पक्क होण्यासाठी एखाद्या 'टेकू'ची प्रकर्षाने गरज भासते. त्यातूनच वशिलेबाजी आणि शिफारस पत्रांची संस्कृती तयार झाली.


नोकरी मिळविण्यासाठी किंवा आपल्या मर्जीचं एखादं काम होण्यासाठी आपण ज्या वेळेला एखाद्या राजकीय नेत्याकडे किंवा VIP  कडे मदत मागायला जातो, त्याआधी आपण बरचसं होमवर्क सुद्धा केलेलं असतं. आपल्या कामाचा निर्णय घेणं नेमकं कोणाच्या हाती आहे?, तो कोणाचं ऐकू शकेल? त्याच्यावर कोणाचा प्रभाव जास्त आहे? शिफारस करणारा आणि त्यांचे संबंध कसे आहेत? त्यांनी अशा प्रकारची कामं आधी केली आहेत का ? इ इ. प्रश्नांची उत्तरं मिळवून त्याची निवड पक्की केली जाते.


एकदा या मार्गाने जायचं म्हटलं तर मघाशी म्हटल्याप्रमाणे होमवर्क ला फार महत्व आहे. एकदा काम करणारी व्यक्ती कोण हे नक्की ठरलं की दुसरी शोधमोहीम सुरू होते.चिठ्ठी किंवा शिफारस पत्र देणारा वशिला कोण पुरवणार त्याचा शोध आणि निवड हि सुद्धा एक अभ्यासपूर्ण आणि मजेशीर प्रक्रिया आहे. यात एलिमिनेशन राउंड पूर्ण करून एक शॉर्टलिस्ट बनते आणि त्याच्यातून अंतत: सर्वात प्रभावी एकाचं नाव फायनल होतं. अशा पद्धतीने एक अदृश्य स्पर्धा झाल्यावरच आपला 'वशीला'  विजेता ठरतो.


त्यानंतर तुमची स्वतःची त्या नेत्यापर्यंत पोहोचण्याची पत/ऐपत किंवा ओळख परिचय नसेल तर तुम्हाला अजून एका छोट्या टेकूची किंवा उपनेत्या (source)ची गरज असते. ती व्यक्ती मात्र तुमच्या अगदी जवळची असली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला मदत करायची या व्यक्तीकडे तीव्र इच्छा पाहिजे, किंवा तशी इच्छा त्याच्या मनात तयार होण्यासाठी तुम्ही त्याच्या साठी भूतकाळात काहीतरी फायद्याचं  काम केलेलं असावं किंवा वर्तमानात तो खुश होईल असं गाजर त्याच्यापुढे ठेवता आलं  पाहिजे. 


अशारीतीने सोर्सची निवड झाल्यावर तुम्ही त्या नेत्याला भेटता. त्यानंतर त्याला पटवून देण्यासाठी तुमच्याकडे असलेला सर्व पान मसाला खुबीने वापरून जर विडा रंगला तरच तो नेता तुम्हाला मदत (वशिला) पुरवायला तयार होतो. जर त्याला तसं काही करायची इच्छा नसेल तर मात्र तो शिताफीने तुम्हाला गोड गोड बोलून अन्य दुसरा काही मार्ग सुचवेल आणि अंगाला साबण लागल्यासारखा सटकन निसटून जाईल.


समजा, तो तुमचं काम करायला तयार झालाच तर तुम्ही युनिट टेस्ट पास झाले असे समजावे. मग त्यानंतरच्या संपर्काची साधने आपसात चर्चा करून ठरतात. सामान्यता टेलिफोन, निरोप किंवा पत्र लिहून तुमचं शिफारस पत्र तुमच्या खिशात कोंबलं जाईल आणि तेवढ्यानेच तुमची छाती पहिली लढाई (पूर्व परीक्षा) जिंकल्याच्या आनंदात, दोन इंचाने फुगून जाईल.


त्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी सुरु होते. ती म्हणजे हा निरोप किंवा ही चिठ्ठी कशी, कुठे आणि केंव्हा पोचवायची. साधारणतः निर्णय प्रक्रिया सुरू झाल्यावर पण ती पूर्ण व्हायच्या आधीच हा खटाटोप पूर्ण झाला पाहिजे, तरच खरा मुहूर्त साधणं शक्य होईल. अर्थात, नेत्याने दिलेली चिठ्ठी दुसऱ्या पर्यंत पोचण्या त्यांच्यात अन्य काही देवाण-घेवाण न झाल्यास काम  थोडं सोप होतं. चिठ्ठीचा उपयोग होणं न होणं मात्र तत्कालीन विविध घटकांवर अवलंबून असतं. जसं, त्या दुसऱ्या नेत्याचा मुड, तुमच्या वशिल्या पेक्षा अधिक प्रभावी व्यक्तींकडून आलेली शिफारस पत्रे, त्याचा स्वतःचा स्वार्थ, आर्थिक देवाण-घेवाण आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नशीब.

     

                                                                   (उत्तरार्ध)


आपल्यापैकी बहुतेकांनी आयुष्यात  कोणत्या न कोणत्या कामासाठी अशा चिठ्ठ्या, शिफारस पत्रं, फोनवरून शिफारशी इत्यादी मिळवलेले असतात.आमचा मित्र नंदू मराठेनेही  शिफारस पत्रं मिळवली. त्याचे किस्से त्याने आमच्या मित्रांच्या गप्पांमध्ये बऱ्याचदा शेअर केले होते. त्यापैकी दोन किस्से थोडक्यात शब्दांकित केले आहेत.


नंदूने 1972 साली बी ए झाल्यावर शिक्षकाची नोकरी नाशिकच्या तत्कालीन लोकप्रिय आमदाराच्या वशिल्याने एका दिवसात मिळवली होती. परंतु एम ए झाल्यावर लवकरात लवकर चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळवण्यासाठी त्याने उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, वशिल्याची शोधाशोध सुरू केली. आलेल्या जाहिरातींमधून कॉलेजच्या चेअरमन चे नाव कळल्यावर त्यांच्यासाठी कोणाच्या वशिल्याचा हमखास उपयोग होईल यावर चर्चा होउन वशील्याचा रोड मॅप तयार व्हायचा. त्यासाठी नातेवाईक व मित्रांचे भरघोस सल्ले त्याच्या कामी आले. 


१) जिभाऊंची इंग्रजी सही


नंदू ज्या गावी शिकला तेथेच त्याला ओळखणाऱे व नात्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन आमदार जिभाऊंची मदत सहज उपलब्ध होईल म्हणून त्याने ती घ्यायचं ठरवलं. जिभाऊ गावातील सर्वांना नोकरीच्या कामी सढळ हाताने चिठ्ठ्या द्यायचे. नंदू त्यांच्याकडे गेल्यावर त्याने कामाबद्दल सविस्तर सांगितले. जालना येथील महाविद्यालयाची जाहिरात होती, म्हणून नंदू तेथील चेअरमन (ते सुद्धा त्याकाळी आमदार होते)च्या नावे शिफारस पत्र द्यावे अशी विनंती केली.


जिभाऊंनी तत्काल आपले लेटर हेड घेतले आणि पत्र लिहायला सुरुवात केली. नंदू बाजूलाच उभं राहून ते काय लिहितात ते वाचत होता. पत्र लिहून झाल्यावर त्यांनी मोडी अक्षरात सही करायला सुरुवात केल्या बरोबर नंदूने त्यांना थांबवलं. म्हटला "जिभाऊ मला तुमची चिठ्ठी नको.अशा चिठ्ठीचा काही उपयोग होणार नाही". जिभाऊंना एकदम आश्चर्य वाटलं. ते म्हटले, "अरे तूच तर माझ्याकडे शिफारस पत्रासाठी आला आणि आता नाही म्हणतो. काय झालं?".


नंदू त्यांना म्हटला की "जिभाऊ मला कृपया तुमची इंग्रजीत सही केलेलं पत्र पाहिजे. मोडीत किंवा मराठीत सही केलेलं पत्र मला नको".


याचे कारण म्हणजे त्याआधी जिभाऊंनी  नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या अनेक मित्रांना मराठी किंवा मोडीत सह्या करून शिफारस पत्रं दिलेली होती. पण मित्रां बरोबरच्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला होता कि जिभाऊंनी ज्यांना ज्यांना मराठी किंवा मोडीतुन सही करून शिफारस पत्र दिली होती त्यांचं कोणाचंच काम झालं नव्हतं पण ज्यांना इंग्रजीत सही केलेलं पत्र मिळालं होतं त्याचा सक्सेस रेट 60 ते 70 टक्के होता. म्हणजे त्यातून मित्रांनी स्पष्ट अर्थ काढला होता कि या पुढारी मंडळींचं आतून काहीतरी कोड लॅंग्वेज   ठरलेली असते, त्याप्रमाणे ते आलेल्या शिफारशींचा दर्जा ठरवतात आणि त्यानुसार कामं करतात. त्यामुळे जिभाऊंच्या इंग्रजी सहीलाच वजन होतं याची नम्र जाणीव नंदूला होती, पण तसं तो जिभाऊंना स्पष्ट सांगू शकत नव्हता. 


त्यामुळे त्याने जिभाऊंना फक्त इंग्रजीत सही करायची विनंती केली. तसं मोठ्या नाखुशीनेच त्यांनी दुसरं पत्र लिहून इंग्रजीत सही केली. प्रत्यक्षात मात्र त्या सहीचीही नंदूला मदत झाली नाहीच.


*२) घरजावई होतो का? *


नंदूला माहित होतं कि त्याच्या मावशीच्या भाऊबंदकीतले आप्पासाहेब पाटील म्हणजे जिल्ह्यातील तत्कालीन सर्वात प्रभावी राजकीय नेतृत्व. सतत पंधरा वर्ष खासदार, जिल्हा बँकेचे चेअरमन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष इ. सर्वोच्च पदं भूषवून आता ते निवृत्त झाले होते परंतु तरी त्यांच्या शब्दाला मान होता. त्यामुळे त्यांच्या शिफारशीचा नक्कीच उपयोग होईल म्हणून नंदू मावशीच्या गावी गेला. आप्पासाहेबांनी लगेच अपेक्षित शिफारस पत्र नंदूच्या हातात ठेवलं.


जामनेर येथे एका शिक्षण संस्थेचा बराच मोठा पसारा होता.त्यांची जाहिरातही निघाली होती. आप्पासाहेबांचा शब्द खाली पडणार नाही असा दिलासा नंदूला बऱ्याच नातेवाईकांनी दिला होता. शिफारस पत्र घेऊन तो जामनेरला सकाळी दहा वाजता हजर झाला. पण त्यादिवशी चेअरमन साहेब मुंबईला होते. चौकशी केल्यावर कळले की "भाऊ"(जे चेअरमन साहेबांचे बंधू आणि संस्थेचे सेक्रेटरी असून एका विद्यालयाचे मुख्याध्यापक सुद्धा होते,) हेच चेअरमनसाहेबांच्या गैरहजेरीत संस्थेचे काम बघतात. म्हणून मग त्यांना तरी भेटून घ्यावं म्हणजे फेरी वाया जाणार नाही असं नंदूला वाटलं. 


संस्थेत चेअरमनसाहेबांच्या कार्यालयात भाऊ मित्रांबरोबर गप्पा मारत होते. नंदू त्यांना भेटून नोकरीच्या कामा विषयी बोलला. आप्पासाहेबांचे शिफारस पत्र ही दाखवले. त्यांनी नंदूची "सखोल" चौकशी केली, कागदपत्र बघितले आणि चेअरमन नसले तरी तुमचं काम होऊन जाईल असं म्हटले. नंदूला खूपच आनंद झाला.चेअरमन न भेटल्या ची नाराजी क्षणात गायब झाली.अप्पासाहेबांच्या चिठ्ठीने काम फत्ते झालं होतं.


मित्रांचा निरोप घेऊन भाऊंनी "आपण घरी जाऊ या. दुपार झालीच आहे त्यामुळे तुम्ही जेवण करूनच जा" असा प्रेमाचा आग्रह केला. नंदूला पुन्हा एक सुखद धक्का बसला. 


भाऊंबरोबर तो जवळच असलेल्या त्यांच्या घरी पोहोचला. थोड्यावेळाने जेवायच्या पाटावर बसला आणि जेवण वाढायला एका सुंदर मुलीने सुरुवात केली. तिची आई तिच्यापर्यंत एकेक वस्तू आणून देत होती आणि ती ताटात वाढत होती.भाऊंशी नंदूच्या थोड्याफार गप्पा सुरूच होत्या. ते त्यांच्या दोघांच्या कॉमन नातेवाईकांची ओळख सांगून आपण किती जवळचे नातेवाईक आहोत हे पटवायचा प्रयत्न करत होते. गप्पांपेक्षा जेवण छान रंगलं होतं.


बैठक हॉलमध्ये येऊन पुन्हा थोड्याफार गप्पा झाल्या आणि तुमचं नोकरीचं काम नक्कीच होऊन जाईल, काळजी करू नका असं सांगतानाच आपल्या मुलीला हाक मारली. मुलीची ओळख करून दिली आणि सरळ म्हटले कि ही माझी मुलगी, बीएस्सी शेवटच्या वर्षा ची परिक्षा दिली आहे. तुम्ही हिच्याशी लग्न करा, हिलाही आपण पोस्ट ग्रॅज्युएट करूआणि तुम्ही दोघं आपल्या संस्थेतच कायमस्वरूपी नोकरी करा. आणि कालांतराने संस्थेचा कारभार सुद्धा तुम्ही दोघं बघू शकाल. या अनपेक्षित बॉम्ब वर्षावाने नंदूच डोकं अक्षरशा: गरगरायला लागलं. तो गेला होता फक्त नोकरी मागायला आणि त्यांनी तर त्याच्या आयुष्याचा संपूर्ण सारिपाठच समोर उलगडुन ठेवला. 


त्यांचं कन्यारत्न मंदहास्य करत बाजूलाच उभं राहून मूक संमती देत होती आणि माताजी दारात त्यांचा लाईव्ह शो मोठ्या कौतुकाने बघत नंदूच्या होकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा ठेवून होत्या. नंदू घामाघूम झाला. त्याच्या  प्रतिक्रियेकडे त्या तिघांची आशाळभूत नजर त्याला अक्षरशा: बाणांसारखी टोचत होती. तिथून सुटका करून घेण्यासाठी तो जेमतेम त्यांना म्हटला कि तुम्ही ऑर्डर पाठवा, मी घरी जाऊन विचार करून तुम्हाला कळवतो. त्यांनाही बहुतेक त्याच्या धांधलीवरून परिस्थितीची कल्पना आली असावी. 


थोड्यावेळाने त्यांनी नंदूला बस स्टॅन्ड वर सोडून "तुमचा निर्णय लवकर कळवा" म्हटले आणि त्यासाठी त्यांच्या घरचा फोन नंबर सुद्धा दिला.


मधुकर पाटील, पुणे.

9011058739

Post a Comment

0 Comments