मुक्काम पोस्ट झाडानी-एक अविस्मरणीय सहल अनुभव
कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनचा काळ म्हणजे भीतीचे सावट आणि एकान्तवासाने होणारी असह्य घुसमट! भटकंतीची आवड असलेले आम्ही चार-जण मी, सुरेश डेरे,श्रीकांत देशपांडे व शशिकांत कुलकर्णी निर्बंध कमी होताच डिसेंबर (२०२०) महिन्यात जवळपास कुठेतरी ट्रिपला जायचं आम्ही ठरविले ! त्यासाठी महाबळेश्वर जवळील एका आडवळणी असलेल्या “झाडानी” या दुर्गम व चिमुकल्या खेडेगावाची निवड केली! १८ डिसेंबर २०२० तारखेला (शुक्रवार) श्रीकांतच्या नव्या ईग्नीस कारने दुपारी तीनच्या सुमारास तापोळा येथे पोहोचलो.
तेथे आम्हांला घेऊन जाण्यासाठी आमचे मित्र,यजमान श्रीयुत संजय राऊत ( +919403196450) व नंदू लाखे (+919404468606) आलेले होते. त्यांनी आमच्यासाठी टाटा झेनॉन नावाची पिकअप व्हॅन आणली होती. तेथुन सर्वसामानासह गाडी तराफ्यावर चढवली व आम्ही पलीकडे गेलो. तेथून वीस किलोमीटर कच्च्या, खाचखळगे, चढउतार व आजूबाजूला वनश्रीने नटलेल्या रस्त्याने वीस किलोमीटर वेगाने, एक तासाने म्हणजे साडेपाचच्या सुमारास झाडानी येथे,जेथे आमचा मुक्काम होता, तेथे पोहोचलो.
सारवलेले अंगण, त्याभोवती फळं फुलांनी बहरलेली झाडी व त्यामध्ये दडलेले कच्चे, मातीचे घर! याच ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था केलेली! मावळतीच्या प्रकाशात हे सारं भुरळ घालत होते!
तयार होऊन लगेचच आम्ही घराच्या मागील बाजूस पश्चिमेस खुर्च्या टाकून चहाचे घोट सावकाश घेत घेत सुर्यास्ताची वाट पाहत विसावलो ; ते साडेचार हजार फूट उंचीवरून सूर्यास्त पाहण्यासाठी! उंचावरुन सावकाश खाली चाललेले सूर्यबिंब नि:शब्द होऊन डोळ्यात साठवत होतो!
![]() |
| रमाकांत कुलकर्णी, पुणे |
सूर्य वर असतानाच तेथून पश्चिमेस लाली पसरू लागली. सूर्यबिंब थोडेसे उंचावरुन सावकाश खाली चाललेले होते. तेथे थोड्या गप्पा झाल्यानंतर मग आम्ही एक जवळच छोटीसी फेरी मारली.जास्त दूर जायचं टाळलं कारण अनोळखी ठिकाण व अंधार दाटू लागलेला, शिवाय नाही म्हटलं तरी थोडी श्वापदांची भिती.
यापूर्वी आम्ही देश विदेशात भटकंती केली, झगमगाट वैभव पाहिले होते. पण या वेळी नगण्य मनुष्य वस्ती म्हणजे फक्त पाच सहा घरं व पंचवीस-तीस माणसं असलेले, वीज, टी व्ही, इंटरनेट सुविधा नसलेले हे गाव निवडले होते!अजूनही एकोणिसाव्या/विसाव्या शतकातील वाटावे अशा ठिकाणी आम्ही राहणार होतो.
त्या दृष्टीने तयारीनेच आम्ही गेलो होतो.पॉवर बँक नेली होती, कारण फोटो काढण्यासाठी मोबाईल चार्ज असणे गरजेचे होते , बॅटरी, इमर्जन्सी लाईट, गरम कपडे इत्यादी .
येथील लोकांचा मुख्य व्यवसाय गाई, म्हशी पाळणे व लोणी दूध, दही महाबळेश्वर येथे विकणे हाच असून थोडीफार शेती करुन उपजिविका करतात. गाई म्हशींचा चारा हा पूर्णपणे नैसर्गिकरीत्या उगवलेले गवत असल्याने अर्थातच दूध पूर्णपणे सुरक्षित व अप्रदूषित.
रात्री सात साडेसातच्या सुमारास चतुर्थीचा चंद्रप्रकाश हळूहळू रंग भरु लागला, त्यासोबतच पश्चिम क्षितिजावर गुरु शनी युतीचे योगायोगाने अतिशय दुर्मिळ पण स्पष्ट दर्शन शशिकांतने आमच्या लक्षात आणून दिले.निरभ्र आकाश व अप्रदूषित, धूळ विरहीत, मोकळी हवा, कमालीची शांतता.
त्याच सुमारास अंगणातच शेकोटी भोवती
छान गप्पा रंगल्या. ज्वारीची भाकरी, भाजी, भात आमटी असा साधासा बेत होता बराच वेळ गप्पा गोष्टी चालल्या.
रात्री साडेअकराच्या सुमारास आम्ही झोपलो असू.सकाळी कुडाच्या भिंतीच्या फटीतून मुक्त संचार करणाऱ्या वाऱ्यामुळे लवकर जागे झालो , कारण पहाटे साडेचार पाच वाजेपासून जोराचा वारा वाहत होता व कुडाच्या भिंती असलेल्या घराच्या वरील फटीतून त्याचे अस्तित्व चांगलेच जाणवून दिले (१९ डिसेंबर शनिवार). शिवाय थोड्याच अंतरावर कोंबडा (आश्चर्य वाटले म्हणजे शशिकांत नुसार काहिसा मधूर वाटावा अशा आवाजात) आम्हाला जागवण्याचे त्याचे कर्तव्य वेळेवर पार पाडत होता. चहा घेऊन आम्ही चौघेजण तेथील महिला जेथून पाणी आणत होत्या या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी खोल खोल उतरत उतरत घळीत गेलो, तेथे एक विहीर होती स्वच्छ निर्मळ पाणी अगदी उंचावरच होते .फारसे खोल नव्हते,हाताने घेता येण्यासारखे परंतु अतिशय स्वच्छ व निर्मळ, तेथे थोडावेळ फोटोग्राफी करून परत वरती आलो. नाष्टा बाहेरच अंगणात कोवळ्या उन्हात,खुर्ची टेबलावर मांडून ठेवला होता व त्यात फळे व थालीपीठ, त्यावर घरगुती चवदार ताजे लोणी व दही असा बेत होता. परत एकदा चहा झाला.
मग आम्ही सर्वजण जवळच एका थोड्या मोकळ्या जागेत आलो तेथे आमच्या साठी खास धनुष्यबाण पाच पाच राउंड खेळणं आयोजित करण्यात आलं होतं.अगदी प्रोफेशनल रित्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचं रेकाॅर्ड ठेवलं जात होतं. यात सगळ्यात वरचढ कामगिरी श्रीकांत व शशिकांत यांनी केली.मला थोडीशी नामुष्कीच पत्कारावी लागली. यानंतर आमच्याबरोबर नंदू लाखे आणि त्याचा एक स्थानिक सहकारी/गाईड श्री.बांबू नावाचा, असे आम्ही सहा जण भातरस नावाच्या गडावर/डोंगरावर चढून वरती गेलो .
तिथून दोन्ही बाजूला दऱ्या/पठारे व तापोळा बाजूला पाणी दिसत होते एक तापोळ्याची पश्चिम बाजू व दुसरी त्याच्याविरुद्ध बाजू. खूपच सुंदर दृश्य होते. छान ऊन होते गारवा होता व संपूर्ण हिरवागार परिसर त्यातील पूर्ण बारिक सारिक माहिती सांगणारे नंदू लाखे व स्थानिक बांबू. असा हा ट्रेक कम स्ट्रेस टेस्ट करुन आम्ही एक-दीड वाजेपर्यंत आमच्या राहण्याच्या ठिकाणी परतलो. त्यानंतर बेत असा ठरला की आपण खाली, एका सावली असलेल्या एका छान झऱ्याच्या काठी जाऊन जेवण बनवायचे आहे. मग सर्व साहित्य दोन पोर्टेबल काॅट, भांडी, प्लेट व शिधापाणी इत्यादी सर्व घेऊन आम्ही उतरत उतरत साधारणत: एक दीड किलोमीटर खाली एका घळीत दाट झाडाच्या सावलीत जेथे एका बाजूने निर्मळ खळाळणारा झरा वाहत होता तेथे संसार मांडला. तेथे धोंडीरामच्या मदतीने संजयने तीन दगडांची चूल मांडून कांदा/बटाटा घालून फोडणी देऊन खिचडी शिजत ठेवली . तेथेच आम्ही इकडे तिकडे फिरत गप्पा मारत वेळ काढला.
छान वातावरण होते, अतिशय शांतता, निवांतपणा. पश्चिमेस खोल खाली डोंगरांचे, शेतीचे, दरीतले दूर पर्यंत दिसणारे निसर्ग रमणीय दृश्य. असे सर्व एन्जॉय करून झाले. खिचडी तयार झाली. आरामात दही खिचडी लोणचे असे वनभोजन करून आम्ही परत एकदा सर्व साहित्य घेऊन साफसफाई करून चढ चढून घरी आलो.
पुन्हा एकदा सूर्यास्ताचे दर्शन घेतले व परत जवळच एक फेरी मारली.आजचा दिवस इतका व्यस्त व भरकन गेला की कळलेच नाही.मात्र एवढे असूनही कुणाचाही उत्साह मावळला नव्हता.
संजयने आमच्या हस्ते प्रत्येकी दोन दोन झाडे लावण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या झाडांची दहा बारा रोपे आणून ठेवली होती.आम्हाला प्रत्येकी दोन रोपे व त्यासाठी योग्य जागा निवडणे हे काम आमच्यावर आमचा सन्मान म्हणून सोपवले होते.आम्ही त्यानुसार रोपे व जागा यांची निवड करुन ठेवली.अंधार वाढू लागल्याने झाडांसाठी दोनच खड्डे करुन उरलेले सकाळी करण्याचे ठरले.
आज चंद्र प्रकाश अधिकच उजळला होता. पुन्हा एकदा निरभ्र आकाशात गुरु शनी युतीचे व इतरही ग्रह ताऱ्यांचे मनसोक्त दर्शन घेतले.
आज बांबूने शेकोटीसाठी जाडजूड लाकडे आणली होती. गप्पा गाणी व संजयने हौसेने बार्बेक्यूवर भाजलेले अंडी,भाज्या कसा उत्कृष्ट भोजनाचा आनंद मोकळ्या आकाशाखाली घेतला.
जास्त वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वांना लवकरच जाग आली.चांगलीच बोचरी थंडी जाणवत होती. आज लवकरच परतीचा प्रवास सुरु करायचा आहे, असे ठरले होते.त्यामुळे पहिल्या चहानंतर लगेचच बांबू व धोंडीराम यांच्या मदतीने ठरलेल्या ठिकाणी खड्डे घेऊन खत घालून झाडे लावण्यात आली.
व्यायामाबरोबर वृक्षारोपणाचा आनंद घेतला.त्यामुळे पोह्यांबरोबर मटकीच्या उसळीचा नाष्टा घेतांना अगदीच 'ऐदीपणे खाणं' असा ठपका कोणी ठेऊ शकत नव्हते.
आता निघण्याची सर्व तयारी पुर्ण झाली.सामान पिकअपमध्ये ठेवले. आमच्याबरोबरच तेथे आलेली एक माहेरवाशीण आपल्या छोट्या दोन मुली आणि एक वर्षाचा मुलगा व तिचा भाऊ असे ते गोड कुटुंब तापोळ्यापर्यंत प्रवास करणार होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.गावातील/कुटुंबातील सर्व मंडळी (एकूण जवळजवळ वीसजण) निरोप द्यायला जमले होते.साडेनऊ वाजता आम्ही झाडानी सोडले व मजल दरमजल करत संध्याकाळी सहा वाजता आम्ही कवठे येथील आबांच्या (डेरे) आंबा बागेत पोहचलो.मुळात आबांना कवठे येथे सोडून उरलेले आम्ही तिघेही पुण्याला परतणार होतो.मात्र नंतर असे कळले की संपूर्ण डेरे कुटुंबिय पुण्याला गेले आहेत.त्यामुळे आबांच्या आग्रही मागणी मुळे आम्ही सर्वांनी कवठे येथे आबांच्या घरीच मुक्काम करून सकाळी त्यांच्या ऊसाच्या मळ्यात जाऊन पुणे प्रस्थान ठेवले. कोरोनातील घुसमट झुगारत ताजेतवाने होऊन आम्ही आमची करोना काळातील काळा भूतकाळ मागे सारुन झाडानीच्या एका वेगळ्याच अनुभवाने मनावरची काजळी झटकून टाकून मन ताजेतवाने होऊन टवटवीत करणारी ही सहल अविस्मरणीय ठरली. ह्याचे संपूर्ण श्रेय श्री.संजय राऊत,नंदू लाखे व आबांना दिलं पाहिजे.वर्णनानुरुप काही मोजकेच फोटो वाचकांना प्रत्यक्ष अनुभूती देतील अशी अपेक्षा.
रमाकांत कुलकर्णी, पुणे
+91 97300 81941



2 Comments
By reading itself,I felt unique enjoyable experience.wonderful***
ReplyDelete*झाडनी च्या निमित्ताने*
ReplyDeleteरमाकांतने डिसेंबर मध्ये आपल्या मित्रांसोबत केलेल्या झाडनी गावाच्या परिसरातील वर्जिन निसर्गाचं इत्यंभूत दर्शन, प्रवास वर्णनाच्या स्वरूपात, आपल्याला ग्रुप वर पोस्ट टाकून घडवलं होतं. ते वर्णन संक्षिप्त स्वरूपात महाराष्ट्र टाइम्स मध्ये गेल्या आठवड्यात आणि आता डोंबिवलीच्या एका इ-पेपर मध्ये विस्तृत स्वरूपात प्रसिद्ध झालं आणि झाडनी गाव आता सर्वतोमुखी झालं.
आमच्या खान्देश मध्ये *झाडनी* म्हणजे घर आणि परिसरातील कचरा काढायला वापरले जाणारे साधन. शहरातल्या केरसुणीला तिकडे झाडनी (जिच्याने झाडतो ती झाडनी) म्हणतात. घाण आणि कचरा साफ करणारी वस्तू तुच्छ न मानता झाडनीला *लक्ष्मी* मानतात आणि तिचं पावित्र्य राखलं जातं. तिला चुकून जर पाय लागला तर झाडनीला हात लावून नमस्कार केला जातो. वर्षातून एकदा झाडनी,सूप यांची यथासांग पूजा केली जाते.
मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून *झाडनी* बनते. झाडनी बरोबर बांबूपासून टोपल्या आणि सूप (सुपडं);शेताच्या बांधावर संरक्षणासाठी लावलेल्या केतकी नावाच्या कॅक्टसच्या लांब लांब पानांवर प्रक्रिया करून दोर/दोरखंड बनवले जातात.गावातील ठराविक गरीब आणि कष्टाळू वर्ग, कुटुंबातील सर्व लहान-मोठे सदस्य स्री पुरुष, कमी भांडवलातून चालणाऱ्या या कुटिरोद्योगातून आपला उदरनिर्वाह करतात.