कथा : मधुकरी

                                                                                                                    ****************   

                           मधुकरी

  **************** 

               आमचे कौतिक मामा 


तारीख 27 मे 1964. ही तारीख कायमची मनावर कोरली गेली आहे. त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी भारताचे  पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले होते. आणि त्याच दिवशी आमचे कौतिक मामा सुद्धा,वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षीच आम्हाला सोडून अकल्पितरित्या, स्वर्गवासी झाले. स्वतःच्या गावी शिक्षणाची चांगली सोय नसल्यामुळे मला उंबरखेड ( चाळीसगाव) येथे मामाच्या गावाला शिक्षण घ्यायचे भाग्य लाभले. मामाच्या घरा पासून तीन घरे सोडून कै. कौतिक मामाचे घर होते.


श्री बारकू तान्हा पाटील या शेतमजुराच्या घरात कौतिक मामाचा जन्म झाला. बारकू बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य मारवाड्याच्या शेतावर शेतमजूर (सालगडी) म्हणून काम केले.वर्षाकाठी मिळणारी मजुरी म्हणजे एक पोतं धान्य, दर दिवाळीला मिळणारी एक धोतर जोडी , सदरा आणि पत्नीला एक साडी. महिन्याला मिळणाऱ्या दहा-पंधरा रुपयात तेल मिठ निघायचं. बस याच्यावरच घर चाललं होते. बारकू बाबा आणि फुला आजी म्हणजे दारिद्र्यातील लक्ष्मीनारायणाचा जोडा. अतिशय सज्जन आणि प्रामाणिक.  आहे त्यात संपूर्ण समाधान मानणारे जोडपं.


बारकू बाबा आणि फुला आजी यांना एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीलाही अशाच एका गरीब घरी दिले होते. आपल्या घरच्या दारिद्र्याचा अंधकार केवळ आपला सुपुत्र कौतिकच दूर करू शकेल, ही त्यांची माफक अपेक्षा.


आम्हाला आठवतो तो कौतिक मामा तो  मॅट्रिक आणि त्यानंतर त्याच्या पदवीपर्यंतच्या काळातला.मामा  केवळ पाच सव्वा पाच फुट उंचीचा, जाड भिंगाचा सोडावॉटरच्या बाटली सारखा चष्मा, गोलाकार चेहरा आणि मोठे डोके. कपाळावर अवेळी आलेल्या दोन आडव्या रेषा, कुपोषणाची नाही तरी वारंवार घडणाऱ्या उपासमारीच्याच खुणा त्याच्या भाळावर मिरवत होत्या. किंचित कुरळे  मागे घेतलेले केस असायचे.

कौतिक मामा बर्‍यापैकी हुशार होता. मॅट्रिक पास झाल्यावर पदवीधर होऊन नोकरी करायची आणि घरातल्या दारिद्र्यावर मात करायची त्याची आस होती. 


बारकू बाबाची गरिबी आणि अथक कष्ट कमी पडले की काय त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि जायबंदी होऊन ते खाटेवर कायमचे आडवे झाले. सालगड्याचे अल्पशे मिळणारे उत्पन्नही बंद झाले. आणि हे नेमके कौतिक मामाच्या मॅट्रिकच्या वर्षातच घडायचे होते. जिवंत राहण्या पुरतं घरखर्च मिळवण्यासाठी फुला आजी गल्लीतील धुणी-भांडी करू लागली.


        मामाच्या पदवीधर व्हायच्या स्वप्नावर अचानक मोठे प्रश्नचिन्ह लागले. परंतु त्याकाळी उंबरखेड ची आठ दहा मुले पुण्याला पदवी शिक्षणाकरता वेगवेगळ्या कॉलेजमध्ये  दाखल होती. कौतिक मामा ची बिघडलेली आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती आणि त्याच बरोबर त्याची पदवीधर व्हायची दुर्दम्य इच्छा बघून त्यांनी त्याला पुण्याला बरोबर घ्यायचे ठरवले. इतर मुले इंजिनिअरिंग,एग्रीकल्चर, मेडिकल इत्यादी कोर्सेस करत असताना बीए करणारा हा एकटाच पठ्ठा होता. कारण इतर कोर्सेस त्याला अजिबात परवडणारे नव्हते. कॉलेजच्या चार वर्षात  त्याच्या मापाची एकही कापड जोडी त्याच्या नशिबी नव्हती. मित्रांचे लांब किंवा ढगळ कपडे घालून वावरण्यात त्याला कधीच कमीपणा वाटला नाही. कारण कपडे हे दिसण्याकरता नसून केवळ अंग झाकण्यासाठीच असतात अशी त्याची ठाम समजूत असावी.


        दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत तो गावी यायचा आणि त्या काळातच आमची त्याची खरी गट्टी जमायची. आम्ही पाचवी ते सातवी त शिकत असलेली पंधरा वीस मुले घेऊन कौतिक मामा आमचे पारावरचे सायंगुरुकुल चालवायचा. गावाच्या मध्यावर असलेल्या पारावर संध्याकाळी जमून आम्ही शिस्तीत तीन रांगांमध्ये बसायचो.आम्हाला प्रार्थना, भक्ती गीते, सुविचार आणि त्यांचे अर्थ, रामायण-महाभारतातल्या गोष्टी, विनोबांची गीताई इ.इ. कौतिक मामांकडून  शिकण्यात आणि ऐकण्यात  तास दोन तास केव्हा संपायचे ते कळायचेही नाही. आमच्याकडून आठवड्याच्या शेवटी कथाकथन, भाषण कला, पाठांतर इ. करून घेतलं जायचं.  हे सर्व काही एकदम हसत खेळत. आमचा कौतिक मामा म्हणजे आमच्यासाठी साक्षात सानेगुरुजीच.  चैतन्याचा अखंड झरा. सतत हसरा चेहरा, मनमिळावू स्वभाव. कधीही कुणाला रागवलेले आम्हाला आठवत नाही. आपल्याला जे ठाऊक आहे ते सर्वांपर्यंत पोचवावे ही त्याची तळमळ आम्ही अनुभवली होती. प्रत्येक सुट्टीत कौतिक मामा कधी घरी येतो याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो.  त्याच्या एवढी निस्पृह सांस्कृतिक श्रीमंती आम्ही कधी अनुभवलीच नव्हती.


         उच्चशिक्षित होण्याची त्याची आस पूर्ण करायला मित्रांची साथ होतीच पण त्याच बरोबर थोडा आर्थिक टेकू त्याच्या सख्या मामाने सुद्धा दिला. भाचा शिकला आणि नोकरीला लागला तर बहिणीच्या घरची गरिबी तर जाईलच पण त्यामागे आपल्या एकुलत्या एक मुलीचे (ईंदूचे) आयुष्यही सुखाचे जाईल हा व्यावहारीक दुहेरी स्वार्थही होता. कौतिकचे मामा श्रीमंत नव्हते, पण पगारदार नोकर (प्राथमिक शिक्षक) होते, म्हणून भाच्याला थोडेफार पैसे देऊ शकत होते.


        कौतिक मामाचे ग्रेज्युएशनचे शिक्षण पूर्ण करून एप्रिल महिन्यात एकदाचे, कायमस्वरूपी,गावी येणे झाले. उन्हाळी सुट्टी संपल्यावर रिझल्ट लागला कि त्याला लगेच नोकरी मिळेल असा सर्वांचा आराखडा. आणि त्याच सुट्टीत ठरल्याप्रमाणे आपली मुलगी बहिणीच्या घरी सून म्हणून पाठवायची मामाची इच्छाही पूर्ण होणार होती.


        सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. मे महिन्यातल्या तिसऱ्या आठवड्यात मामाच्या घरी लग्नसमारंभ ठरला. दोन-तीन बैलगाड्या भरून उंबरखेडहून वऱ्हाडी मंडळी मालेगाव जवळच्या दाभाडी येथे पोहोचली. हळदीचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी विवाह सोहळा. एकदा हळद लावल्यावर नवरदेव किंवा नवरीने एकट्याने कुठे बाहेर जायचे नसते याची दोघांना कल्पना देण्यात आली. अशा कल्पनांना अंधश्रद्धा समजून धुडकावून लावण्यात कौतिक मामाकडे पुरेसे आत्मबळ होते. लग्न सोहळ्याच्या दिवशी सकाळी मामा एकटाच प्रातर्विधीसाठी गावाबाहेर गेला. त्यानंतर  विवाह समारंभाचे सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडले, आणि .... आणि कौतिक मामाला ताप चढायला सुरुवात झाली. नवरदेवच आजारी पडला म्हटल्यावर जाणकार मंडळींनी ताप उतरण्यासाठी वेगवेगळे उपचार सुचवले. पण ताप काही उतरत नव्हता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हळद फेडण्याचा (उतरवण्याचा) कार्यक्रमही करता येत नव्हता. तोही दिवस तापातच गेला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ताप मामालाच घेऊन गेला. दोन तिन दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं. तीन दिवसापूर्वी लग्नाला निघालेला चैतन्याचा झरा निश्चल स्वरूपात आपल्या घरी परतला होता.आणि तो घातवार होता 27मे 1964


        तीन दिवसापूर्वी सळसळणारा चैतन्याचा झरा निर्जीव होऊन आपल्या घरी परत आला होता. त्यादिवशी गावात जिथे जिथे रेडिओ होते तेथे लोक घोळक्याने प्रधान मंत्र्याच्या निधनाच्या बातम्या ऐकून शोकमग्न झाले होते. अशा वातावरणात कौतिक मामाचे  कलेवर येऊन पोहोचले होते. गव्हाळ रंगाचा मामा हळद लावून सुद्धा काळवंडलेला दिसत होता.मामा बरोबर लग्नाला गेलेली आई तो कायमचं सोडून गेल्यापासूनच थिजली होती. बहिणीचा तर हंबरडा फोडून सतत रडल्या मुळे आवाजच बाहेर पडत नव्हता. अर्धांगवायुने गलितगात्र झालेला बाप लग्नाला सुद्धा जाऊ शकला नव्हता. एकुलत्या एक मुलाच्या शवाला स्पर्श करणेही शक्य होत नव्हते. त्याच्या डोळ्यातलं पाणीच आटलं होतं. भिरभिरत्या नजरेनं समोर अनाकलनीय काही तरी झाले आहे हेच भाव जाणवत होते.


        त्यादिवशी गावात चुल पेटली नव्हती. सर्व गाव गोळा झाला. सर्वजण हुंदके देत होते.आमच्या बाल कंपनीने मात्र आमच्यापासून आमच्या सर्वप्रिय मित्राला हिरावून नेणाऱ्या देवाला घसा फोडून शिव्या दिल्या. त्या दिवसापासून देव या संकल्पनेवरचा माझा विश्वास उडाला तो उडालाच. त्यानंतरच्या आयुष्यात बरीच छोटी-मोठी तीर्थक्षेत्र/मंदिरं बघितली आणि जगरहाटी म्हणून हातही जोडले, परंतु ते नेहमी देवापुढे नव्हे तर दगडापुढेच जोडले गेल्याचा भाव कायम राहिला (अपवाद फक्त पंढरीच्या पांडुरंगाचा).


        तासाभरात हळद उतरवून शेवटची आंघोळ घातली गेली आणि अंत्ययात्रेची तयारी झाली. एक मैलांचे संपूर्ण अंतर प्रेत यात्रेने व्यापून टाकले. सूर्यास्ताच्या साक्षीने आणि असंख्य हुंदक्यांच्या आवाजात आमचा ग्रामसूर्य कायमचा अस्तंगत झाला होता. आमच्या छोट्याशा बाल जगातील समुद्रातला दिपस्तंभ कोसळल्याने आमची छोटी छोटी गलबतं मात्र सैरभैर झाली होती.


        त्यानंतरचे सोपस्कार करायला घरात कोणी राहिलेच नाही. दरम्यानच्या काळात तेलाविना ठिपक्याच्या स्वरूपात जळत असलेल्या बारकू बाबा आणि फुलाआजीच्या पणत्याही विझल्या. घराची बखळ ( पडझड झालेल्या जागेला खानदेशी शब्द) झाली. ना  राहिला चिरा ना राहिली पणती.


इकडे सातवी पास झालेली पंधरा वर्षाची इंदूबाई क्षणात नवरीची विधवा झाली होती. आते भावाच्या मृत्यूला मामेबहीण कारणीभूत एवढेच त्याचे स्वरूप राहिले नव्हते तर एक नवरी तिच्या नवऱ्याच्या अकाली निधनाला सहजपणे जबाबदार धरली गेली होती. तिला पांढऱ्या पायाची, कपाळकरंटी समजायला कुणाला वेळ सुद्धा लागला नाही. अनपेक्षितपणे एका अंधार खाईत ढकलले गेल्यामुळे तिच्या आर्त हाकाही कुणाला ऐकू गेल्या नाहीत. किंबहुना त्या कुणाला ऐकायच्याही नव्हत्या.


        रामायणातील वनवासात सीतेसमवेत प्रभुराम होते. इथे तर रामच सोडून गेल्यामुळे विधवा सीतेला, तिचा काहीही दोष नसताना, अनंत कालीन अंधारकोठडी मिळाली होती.रामायणात प्रभूराम स्पर्षाने शिळेची अहिल्या झाली होती आणि येथे तर  सीतेचीच शीळा झाली होती. तिच्या मनाची घालमेल ती कोणाकडे व्यक्तही करु शकत नव्हती. रंगवलेल्या स्वप्नांचा एका क्षणात चक्काचूर झाला होता.

        जन्मदात्या बापाने तिला "कपाळकरंटी" संबोधून तिचे काळे तोंड बघणार नाही असे जाहीरच करून टाकले होते. जगरहाटी म्हणून आणि पोटाची खळगी भरण्याकरता त्या शिक्षकाने जूनमध्ये शाळा उघडल्यावर आपली नित्याची नोकरी सुरूही केली होती. आईचं रांधून झाले कि मुलाकडून ताट इंदुबाई कडे वर्षानुवर्षे सरकवले जात होतं.अशी अंधार यात्रा सतत बारा वर्ष सुरू राहिली आणि तिच्या आयुष्यातही पहाट उगवली.

         शेवटी सांध्यप्रकाश आणि  तांबडं यातल्या  तांबूसपणात साम्य आणि साधर्म्य असतेच की. कौतिक मामाच्या अशा अनपेक्षित exit ने आम्हाला कित्येक महिने अस्वस्थ ठेवले. मामाचे अथक प्रयत्न, अतिशय साधी राहणी, निर्मळ, प्रांजळ  आणि सुसंस्कृतमन त्यांच्या अठराविश्व दारिद्र्यानेही करपलेलेआम्हाला कधी दिसले नाही, आणि त्यानेच आम्हाला सामर्थ्य दिले.


        एखाद्या खेड्यातील गरीब बालगोपाळांना (ज्यांना आपल्या अशिक्षित आणि कष्टकरी पालकांकडून  दुरापास्त असलेले) सांगीतिक, संस्कृतिक आणि साहित्यिक सामर्थ्य निस्वार्थपणे कोणी कनवाळू व्यक्तीने मिळवून देणं किती दुर्लभ असते ते अशा खेड्यात जीवन व्यतीत  केलेल्यांना चांगलेच ठाऊक आहे.कौतिक मामांच्या शिकवणुकीचे आणि संस्काराचे मार्गदर्शन आम्हाला आयुष्यभर मिळतच आहे, हे आमचे सौभाग्य. कौतिक मामाचे कौतुक आम्हाला नेहमीच राहील.


                                                            लेखक: मधुकर पाटील, पुणे.

Post a Comment

0 Comments