मधुकरी (पुष्प 3)
********************************************
न्हावी - खेड्यातला सच्चा समाज मित्र
न्हावी म्हटलं की आपल्या समोर उभी राहते ती प्रसिद्ध हास्यकलाकार कै.राम नगरकर यांची विनोदी प्रतिमा. आपल्या पारंपारिक धंद्याशी इमान राखत त्यांनी त्यांच्या जीवनातील चढ-उतारांना विनोदाची झालर घालून अनेक दशकं आपलं मनोरंजन केलं आणि 'रामनगरी' लिहून आपलं गरिबीचं आणि कष्टाचं जीवन जगासमोर उलगडलं.
जुन्या ब्लॅक अँड व्हाईट मराठी चित्रपटांमध्ये (आणि बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा, उदा. शोले) न्हाव्याची प्रतिमा मात्र नकारार्थी रंगवली जायची.ती म्हणजे त्याने गावातील(खरीखोटी) बित्तंबातमी काढायची आणि ती इकडची तिकडे पोचवायची हा त्याचा नारदीय उद्योग पडद्यावर दाखवला जायचा. शोले चित्रपटातील जेल मधला प्रसिद्ध सीन आठवत असेल.
खरंतर न्हावी समाज म्हणजे पिढीजात आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि शिक्षणात जेमतेम. आजही ग्रामीण जनतेचा एक मोलाचा, गरीब आणि कामसू साथीदार जो पिढीजात कामासी प्रामाणिक राहून जेमतेम पोट भरतो.हा समाज राजकारणा पासून कायम चार हात दूरच राहिला.नाव्ह्याचा व्यवसाय करून गावी कुणी माडी बांधल्याचं आपण बघितलं नाही.पण हो, शहरी भागातले आजचे लॅक्मे सलून आणि ब्युटी पार्लर वाल्यांनी इमारती जरूर उभ्या केल्यात.
बारा बलुतेदारांपैकी अनेक शतकांपासून घट्ट पाय रोवून ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या मोजक्याच शिल्लक घटकांपैकी हा एक सच्चा समाज मित्र. सर्वांच्या कौटुंबिक उत्सव समारंभांत हक्काचा मदतनीस म्हणून पिढ्यानपिढ्या त्याचंअस्तित्व अबाधित आहे.आपल्या केस कर्तनाच्या मोजक्याच धारदार शस्त्रांच्या जोरावर थेट आपल्या डोक्याशी, चेहऱ्याशी आणि मानेशी मर्जीप्रमाणे खेळणारा, अगदी राजा आणि रंक दोघांनाही झुकायला लावणारा हा एकमेव बलुतेदार.
बालपणी जावळ काढतानाच त्याचा धारदार आणि तितकाच असरदार धाक आपल्या मानगुटीवर बरेच वर्ष रहायचा.त्यानंतर शालेय जीवनात जवळ-जवळ प्रत्येक महिन्याला त्याच्याशी सामना होताच.कानावर केस आले की तिकडे शाळेत मास्तरांचा धाक आणि इकडे न्हाव्याने दाबलेलं डोकं, वस्तऱ्याची धार आणि मशीनचे बोचकारे.अगदी इकडे आड अन् तिकडे विहीर. कटिंग टाळायला अक्षरशः गल्लीबोळातून पळापळ व्हायची.
केसांची वाढ अखंड होत असल्याने त्याच्याकडे वारंवार (बार बार) जावं लागतं आणि म्हणूनच कि काय त्याला इंग्रजीत बार्बर म्हणत असावेत. मराठीत त्याचं दुसरं नाव नााभिक.म्हणजे भिक न मागणारा. बहुतेक हे नाव त्याच्या स्वाभिमानी कामसू बाण्याला अधोरेखित करण्यासाठीच ठेेवलं असावं .
गावी न्हावी दादाकडे लहानशी लोखंडाची पेटी, जिला 'धोपटी' म्हणतात, ती असते.जिच्यात कटिंग दाढीची सर्व हत्यारे कोंबलेली असतात. एक छोटी आणि एक मोठी कात्री, दोन वस्तरे आणि कंगवे.केस बारीक करायची मशीन, वस्तर्याला धार लावण्यासाठी एक चपटी काळी शिळा आणि एक चार बाय तीन इंचाचा छोटा आरसा. आणि हो, दाढी करण्यासाठी कोणतेही शेविंग क्रीम न वापरता लाईफ बॉय किंवा लक्स चा एक छोटासा तुकडा आणि पाण्यासाठी अल्युमिनियम की छोटी वाटी. बस एवढाच काय तो धंद्याचा लवाजमा. पन्नास वर्षांपूर्वी एकूण एकरकमी भांडवली गुंतवणूक साधारणता पन्नास रुपयांच्या घरात, आणि वार्षिक देखभाल खर्च दहा-पंधरा रुपये. कमीत कमी भांडवलावर अख्ख घर चालवणारा हा एकमेेव व्यवसायीक.
छोट्या गावात एक किंवा दोन घरं आणि मोठ्या गावांमध्ये 3-4 नाव्ह्यांची घरं संपूर्ण गावाची आपापसात सोयीनुसार वाटणी करून नुसतं दाढी कटींगचीच नव्हे तर वाटणीला आलेल्या गल्लीतील आणि घरांतील इतर अनेक छोट्या-मोठ्या समारंभात ठराविक कामे करून ते आपला उदर निर्वाह वर्षानुवर्षे करताहेत.जोडीला थोडीफार शेती आणि दुधासाठी एकादी गाय किंवा शेळी.
गावातील मंडळी आपल्या न्हाव्याला त्याच्या कामाच्या मोबदल्यात वर्षाकाठी, आपपसात ठरल्याप्रमाणे, धान्य डाळी द्यायची. बहुदा लोक त्याकाळी गहू जास्त देत असावेत म्हणून या पद्धतीला ग्रामीण भागात 'गव्हाळी' म्हटलं जातं.गव्हाळी म्हणजे वर्षभरासाठी धान्य रुपाने दिलेली मजुरी.त्याबदल्यात न्हाव्याने वर्षभर घरातल्या सर्व मुलांची, पुरुष मंडळींची एवढेच काय आलेल्या पाहुण्यांची सुद्धा दाढी कटिंग करणे अपेक्षित असायचे, म्हणजे दर वेळी रोख पैसे मोजायला नकोत.
न्हाव्याचं रोजचं धंद्याचं ठिकाण म्हणजे त्याच्या घरासमोरच्या गल्लीत किंवा ओट्यावर एका गोणपाटावर बैठक मांडून सकाळी दोन तीन तासात आपला कार्यभाग पूर्ण करणं. त्यानंतर गावातल्या निवडक मोठ्या असामीं च्या घरी जाऊन सेवा पुरवणं.
एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याचं सुतक दहाव्या दिवशी गावच्या नदीकाठी फेडतांना संपूर्ण भावकीची चंपी - दाढी करावी लागते. भाऊबंदकी मोठी असेल तर गावातील आणि कधीकधी शेजारच्या गावातील न्हावी बंधूंना हाक देवून एक फौज, एकमेका सहाय्य करू या तत्वावर, उभी केली जाते. अशाप्रकारे व्यक्तीच्या जीवनातील पाचवी,जावळ, बारसं, मुंज, साखरपुडा, लग्न, सत्यनारायण पूजे पासून थेट दहाव्या पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या कुटुंबाच्या धार्मिक सोपस्कारात सामील होणारा अविभाज्य घटक म्हणजे न्हावीदादा.
बाळ जन्मल्यावर 'पाचवी', बारसं किंवा लग्न अशा शुभप्रसंगी न्हावीदादा एक वाद्य वाजवतो, त्याचं नाव 'भेर'. हे वाद्य जगात केवळ खान्देशी न्हावीच वाजवतो आणि तेही केवळ शुभ समारंभ प्रसंगीच.भेर म्हणजे एक पितळी दहा-बारा फूट लांबीचं दोन भाग जोडून आवाज काढणारं एक प्रचंड वायु वाद्य.तिचं थोडंसं साम्म्य म्हणजे हिमाचल प्रदेश मधील तुरही (सरळ, वक्र नव्हे)हे फुंकर वाद्य. त्याच्या अरुंद नळकांड्या तून तोंडाने जोरदार फुंकर घालत पुढच्या दोन फूट व्यासाच्या भोंग्यातून निघणारा प्रचंड गगनभेदी आवाज. हा आवाज खेड्यात अगदी दोन ते तीन किलोमीटर पर्यंत सहज ऐकू जातो.कार्यक्रम सुरू झाल्याची गावकऱ्यांसाठी ती एक सूचनाच असते.
केस कर्तनाच्या मुख्य कामाव्यतिरिक्त इतर प्रमुख काम म्हणजे गावात घरोघर जाऊन आमंत्रणं देणे. मग ते सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादा पासून माणूस मेल्याच्या दहाव्याच्या जेवणा पर्यंत कोणतंही असू शकतं.
त्यात आमंत्रणाचेही प्रकार असतात. संपूर्ण कुटुंबाला जेवायला बोलवायचे असेल तर त्याला 'चुल्ह्याला आमंत्रण' म्हणतात. नाहीतर मग सिंगल आमंत्रण, म्हणजे कुटुंबातील कोणीतरी एकाने जेवायला येणे अपेक्षित असतं.ज्याला आमंत्रण द्यायचं आहे पण त्याच्या घराला जर कुलूप असलं तर त्याला, परत आल्यावर, आमंत्रणाची सूचना समजावी म्हणून न्हावी दादा गल्लीतून शेणाचा छोटा गोळा घेऊन त्या कुलपावर लावून जातो.यामुळे बरेच गैरसमज टळण्यात मदत होते, प्रसंगी भांडणं सद्धा टळतात.
लग्न बाहेरगावी असेल तर, आदल्या रात्रीच गावभर फिरून दिलेल्या यादीप्रमाणे घरोघर आमंत्रण देताना ते कोणाकडून आहे, कशासाठी आहे आणि वाहन व्यवस्था किती वाजता आहे हे सर्व तपशील त्याला जेवढी घरं तितक्या वेळेला पुन्हा पुन्हा सांगत फिरत राहावे लागते.लग्नाआधी हळदीच्या कार्यक्रमाला गावातील महिलांना बोलवायचे कामही त्यालाच करायचं असतं. लग्नात आलेले रोख रकमेचे आणि कपड्यांच्या आहेराची यादी मंडपात तोच वाचून दाखवतो. लग्नाच्या पंगतीत पाणी वाढायचं कामही आधी न्हावीच करायचा.त्याच्या अनुभवाचा फायदाही बऱ्याच गोष्टींची आणि पद्धतींची योग्य वेळी आठवण करून देण्यात यजमानांना नेहमीच होतो.
लग्नाच्या मिरवणुकीत भेर वाजवून त्याला लोकांनी जी ओवाळणी (नाणी) भेर मध्ये टाकलेली असते त्याच्यातून बरीच 'वर कमाई' होते. जेवढं मोठ्या घरचं लग्न तेवढी मिरवणूक मोठी आणि कमाई सुद्धा मोठी. लग्न आटोपल्यावर त्याच्या मेहनतीची ठरलेली 'बिदागी' यजमाना कडून मिळतेच शिवाय दोन्ही बाजूंकडून मिळणारी 'खुशाली' यातून त्याची चांगलीच बेगमी होते.
शहरांमध्ये आपल्याला सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींना 'दिवाळी भेट' द्यायची पद्धत आहे. खेड्यात मात्र न्हावी दिवाळी मागण्याची वेगळीच शक्कल लढवतो. तो एक छोटासा आरसा खिशात ठेवून दिवाळीच्या दिवशी गावभर फिरतो आणि कुटुंब प्रमुखाच्या समोर तो आरसा धरतो. ही दिवाळी मागण्याची पारंपरिक पद्धत माहीत असल्यामुळे, त्याला लगेच 'दिवाळी' मिळून जाते. दिवाळीसाठी नोकरदार वर्ग गावी आलेला असतो, त्यांच्याकडून न्हावी दादाला दिवाळी भेटीची मोठी अपेक्षा असते,आणि ती पुरीही होते.
अशाप्रकारे न्हावी दादा म्हणजे कुटुंबातल्या सर्व लहान मोठ्या कार्य समारंभात घरभर वावरणारा आपल्या हक्काचा सदस्यच असतो.त्याच्या कष्टाळू आणि प्रामाणिक सेवेमुळेेच त्याचं सच्चा समाज मित्र म्हणून स्थान आजही अबाधित आहे.
मधुकर पाटील, पुणे
9011058739


0 Comments